म्हणी व त्यांचे अर्थ.mhani va tyanche arth.
|  | 
| mhani-v-tyanche-arth | 
(१) अडला हरी गाढवाचे पाय धरी -
एखादया बुद्धिमान, सज्जन माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख, दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते. 
(२) अति तेथे माती- कोणत्याही
गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारक ठरतो. 
(३) अति शहाणा त्याचा बैल रिकामा -
जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो, त्याचे मुळीच काम होत नाही.
(४) असतील शिते तर जमतील भुते -
एखादया माणसाकडून फायदा होणार असला की
त्याच्याभोवती माणसे गोळा होतात. 
(५) आगीतून फुफाट्यात - एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे. 
(६) आधी पोटोबा मग विठोबा - प्रथम पोटाची सोय पाहावी; नंतर
देवधर्म, परमार्थ करावा. 
(७) आपलेच दात, आपलेच ओठ - आपल्याच माणसाने चूक केल्यामुळे
अडचणीची स्थिती निर्माण होणे. 
(८) आयत्या बिळावर नागोबा - एखाद्याने
स्वतः करिता केलेल्या गोष्टीचा दुसऱ्याने आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे. 
(९) आंधळं दळतं, कुत्रं पीठ खातं - एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा.
(१०) आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे - अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. 
(११) इकडे आड, तिकडे विहीर - दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती. 
(१२) उचलली जीभ लावली टाळ्याला - विचार
न करता बोलणे. 
(१३) उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग -अतिशय
उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे. 
(१४) उथळ पाण्याला खळखळाट फार - अंगी
थोडासा गुण असणाऱ्या माणसाने जास्त बढाई मारणे.  
(१५) उंदराला मांजर साक्ष - ज्याचा एखादया गोष्टीत हितसंबंध आहे, त्याला त्या गोष्टीबद्दल विचारणे व्यर्थ ठरणे. 
(१६) एक ना धड भाराभर चिंध्या -
कोणतेही एक काम पूर्ण न करता अनेक कामे एकामागून
एक करायला घेणे. 
(१७) ऐकावे जनाचे करावे मनाचे - सगळ्यांचा
विचार घेऊन जे स्वतःला पटेल तेच करावे. 
(१८) काखेत कळसा गावाला वळसा - भान
नसल्याने जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे. 
(१९) कानामागून आली आणि तिखट झाली - मागून
येऊन वरचढ होणे.
(२०) कामापुरता मामा - काम करून
घेताना गोड बोलणे आणि काम झाले की त्याला विसरून जायचे.  
(२१) कोल्हा काकडीला राजी - क्षुद्र
माणसे क्षुद्र गोष्टींनीही खूश होतात. 
(२२) कोळसा उगाळावा तितका काळाच - वाईट
गोष्टीबाबत कितीही ऊहापोह केला, तरी ती वाईटच
ठरते. 
(२३) खाण तशी माती - आईबापांप्रमाणे
त्यांची मुले निपजणे. 
(२४) गर्जेल तो पडेल काय - केवळ बडबड
करणाऱ्या माणसाकडून काहीही घडत नाही. 
(२५) गरज सरो, वैदय मरो - एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध
ठेवणे व गरज संपली की त्याला ओळखही न दाखवणे. 
(२६) गरजवंताला अक्कल नसते - एखादी न
पटणारी गोष्टसुद्धा गरजू माणसास वेळप्रसंगी मान्य करावी लागते.
(२७) गर्वाचे घर खाली - फुशारकी
मारणाऱ्याचे कधीतरी गर्वहरण होते. 
(२८) गाढवाला गुळाची चव काय - ज्याला
एखाद्या गोष्टीबाबत काहीच माहीत नाही, त्याला
त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही. 
(२९) गोगलगाय अन् पोटात पाय - बाहेरून
गरीब दिसणारी; पण मनात कपट असणारी व गुप्तपणे
खोडसाळपणा करणारी व्यक्ती. 
(३०) घरोघरी मातीच्या चुली - सामान्यतः
सर्वत्र सारखीच परिस्थिती असते. 
(३१) चार दिवस सासूचे चार दिवस
सुनेचे - प्रत्येकाला केव्हातरी परिस्थिती अनुकूल होतेच. 
(३२) चोर सोडून संन्याशाला फाशी – खऱ्या
अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा होणे. 
(३३) चोराच्या उलट्या बोंबा - स्वतःच
गुन्हा करून दुसऱ्याच्या नावाने ओरडणे. 
(३४) चोराच्या मनात चांदणे वाईट - कृत्य
करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की काय, अशी सारखी भीती वाटत असते. 
(३५) चोरावर मोर - एखाद्या
गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्यावर वरकडी करणे. 
(३६) जित्याची खोड मेल्याशिवाय जात
नाही - मूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही. 
(३७) ज्या गावच्या बोरी त्याच
गावच्या बाभळी - समान शीलाच्या माणसांनी एकमेकांची वर्मे काढण्यात अर्थ नसतो;
कारण एकाच ठिकाणचे असल्याने ते एकमेकांना पुरेपूर
ओळखतात. 
(३८) ज्याची खावी पोळी त्याची
वाजवावी टाळी - जो आपल्यावर उपकार करतो, त्याचे
(उपकारकर्त्याचे) उपकार स्मरून त्याचे गुणगान गावे. 
(३९) ज्याच्या हाती ससा तो पारधी - ज्याच्या
हाती पुरावा किंवा वस्तू त्याला त्याविषयीचे कर्तृत्व बहाल केले जाते; म्हणजेच एकाचे कर्तृत्व; पण ते
दुसऱ्याच्या नावे गाजणे. 
(४०) झाकली मूठ सव्वा लाखाची - गुप्त
ठेवण्याजोगे गुप्तच ठेवावे, व्यंग नेहमी
झाकून ठेवावे. 
(४१) टाकीचे घाव सोसल्यावाचून देवपण
येत नाही - कष्ट सोसल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होत नाही. 
(४२) तळे राखी तो पाणी चाखी - ज्याच्याकडे
एखादे काम सोपवलेले असेल, तो त्यातून
स्वतःचा काहीतरी फायदा उठवणारच. 
(४३) ताकापुरती आजीबाई - आपले काम
होईपर्यंत एखादयाशी गोड बोलणे. 
(४४) तेल गेले, तूप गेले, हाती राहिले धुपाटणे - दोन
फायदयाच्या गोष्टी असता, मूर्खपणामुळे
हातच्या दोन्ही जाऊ देऊन हाती काहीच न लागणे. 
(४५) तोंड दाबून बुक्क्यांचा मार - एखादयाला
विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्गही मोकळा न ठेवणे. 
(४६) थेंबे थेंबे तळे साचे - दिसण्यात
क्षुल्लक वाटणाऱ्या वस्तूंचा हळूहळू संग्रह केला असता, कालांतराने वस्तूंचा मोठा संचय होतो. 
(४७) दगडापेक्षा वीट मऊ - निरुपाय
म्हणून मोठ्या संकटापेक्षा लहान संकट पत्करणे. 
(४८) दुरून डोंगर साजरे - कोणतीही
गोष्ट लांबून चांगली दिसते; परंतु जवळ
गेल्यानंतर तिचे खरे स्वरूप कळते.
(४९) नव्याचे नऊ दिवस - कोणत्याही
गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकून कालांतराने तिचे महत्त्व नाहीसे होणे.
(५०) नाक दाबले की तोंड उघडते - एखादया
माणसाचे वर्म जाणून त्यावर योग्य त्या दिशेने दबाव आणला की चुटकीसरशी, ताबडतोब हवे ते काम करून घेता येते. 
(५१) नाकापेक्षा मोती जड - मालकापेक्षा
नोकराची मिजास अधिक. 
(५२) नाचता येईना, अंगण वाकडे - आपल्याला एखादे काम करता येत नसेल, तेव्हा आपला कमीपणा झाकण्याकरिता संबंधित गोष्टीत दोष दाखवणे. 
(५३) नाव मोठं, लक्षण खोटं - बाहेरचा भपका मोठा; पण कृतीच्या नावाने शून्य. 
(५४) नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा -
नाव मोठे; पण कर्तृत्व कमी प्रतीचे. 
(५५) नावडतीचे मीठ अळणी - आपल्या
नावडत्या माणसाने केलेली कोणतीही गोष्ट कितीही चांगली केली, तरी ती आपल्याला वाईटच दिसते. 
(५६) पदरी पडले पवित्र झाले - कोणतीही
गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नावे ठेवू नयेत, तिच्या बाबतीत समाधान मानावे. 
(५७) पळसाला पाने तीनच - सर्वत्र
सारखीच परिस्थिती असणे. 
(५८) पाचामुखी परमेश्वर - बहुसंख्य
लोक म्हणतील ते खरे मानावे. 
(५९) पालथ्या घागरीवर पाणी - केलेला
उपदेश निष्फळ ठरणे. 
(६०) पी हळद, हो गोरी - कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे. 
(६१) पुढच्यास ठेच मागचा शहाणा - दुसऱ्याचा
अनुभव पाहून त्यावरून मनुष्य काही बोध घेतो व सावधपणे वागतो. 
(६२) बडा घर पोकळ वासा - दिसण्यास
श्रीमंती; पण प्रत्यक्षात तिचा अभाव. 
(६३) बळी तो कान पिळी - बलवान
मनुष्यच इतरांवर सत्ता गाजवतो. 
(६४) बाप तसा बेटा - बापाच्या अंगचे
गुणच मुलात उतरणे. 
(६५) बुडत्याचा पाय खोलात - ज्याचा
अपकर्ष व्हायचा असतो, त्याला सतत अपयशच येत जाते. 
(६६) बुडत्याला काडीचा आधार - घोर
संकटाच्या प्रसंगी मिळालेली थोडीशी मदतदेखील महत्त्वाची वाटते. 
(६७) बैल गेला अन् झोपा केला - एखादी
गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते. 
(६८) भरवशाच्या म्हशीला टोणगा - खूप
आशा वाटणाऱ्याच्या बाबतीत संपूर्ण निराशा होणे. 
(६९) मऊ सापडले म्हणून कोपराने खणू
नये - कोणाच्याही चांगुलपणाचा वाटेल तसा फायदा घेऊ नये. 
(७०) मुलाचे पाय पाळण्यात दिसतात - लहान
वयातच व्यक्तीच्या मोठेपणाच्या गुण-दोषांचे दर्शन होते.
(७१) यथा राजा तथा प्रजा - प्रमुख
माणसाच्या आचार-विचारांप्रमाणेच त्याच्या अखत्यारीतील इतर माणसांचे आचार-विचार
असतात. 
(७२) रोज मरे त्याला कोण रडे - तीच
तीच गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यातील स्वारस्य जाते व तिच्याकडे कोणी
लक्ष देत नाही. 
(७३) लेकी बोले सुने लागे - एकाला उद्देशून;
पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे. 
(७४) लोका सांगे ब्रह्मज्ञान,
आपण मात्र कोरडे पाषाण - लोकांना उपदेश करायचा;
पण स्वतः मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही. 
(७५) वरातीमागून घोडे - एखादी गोष्ट
होऊन गेल्यावर मागाहून तत्संबंधीची साधने जुळवणे व्यर्थ असते. 
(७६) वासरांत लंगडी गाय शहाणी - मूर्ख
माणसांत थोडेसे ज्ञान असणाराही शहाणा ठरतो. 
(७७) विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर - गरजेपुरत्या
गोष्टी घेऊन फिरणे. 
(७८) शहाण्याला शब्दांचा मार - शहाण्या
माणसाला समजावून सांगितल्यास तो ताळ्यावर येतो. 
(७९) शितावरून भाताची परीक्षा - वस्तूच्या
लहानशा भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा करणे. 
(८०) सगळे मुसळ केरात - महत्त्वाच्या
मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे केलेले सर्व श्रम व्यर्थ जातात. 
(८१) सुंभ जळाला तरी पीळ जात नाही - हट्टी
मनुष्याचे हट्टामुळे नुकसान झाले, तरी त्याचा
हट्ट नाहीसा होत नाही. 
(८२) हत्ती गेला, शेपूट राहिले - कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि अल्पसाच व्हायचा
राहिला. 
(८३) हातच्या कंकणाला आरसा कशाला - स्पष्ट
असलेल्या गोष्टीला पुरावा नको.
म्हणी व त्यांचे अर्थ pdf फाइल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.       
Whats app चॅनल लिंक साठी येथे क्लिक करा. संबंधित पोस्ट आपल्याला  चॅनल वर मिळतील.
 
 
No comments:
Post a Comment